जेरॉल्ड परेरा (वय ५०) आणि प्रिया परेरा (४६) असं मयत पावलेल्या जोडप्याचं नाव आहे. दोघंही वसईतील सांडोर परिसरात वास्तव्याला आहेत. अलीकडेच ते फिलीपिन्सला फिरायला गेले होते. विदेशात दोघंही दुचाकीवरून फिरायला जात असताना रस्ते अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना फिलीपिन्स देशातील सेबूमधील बाडियान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० मे रोजी घडली. या अपघाताची अधिकृत माहिती वसई धर्मप्रांत अंतर्गत सांडोर चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेमंड रुमाव यांनी सोमवारी दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जेरॉल्ड परेरा आणि प्रिया परेरा हे फिलीपिन्स येथे सहलीसाठी गेले होते. दोघे तिथे दुचाकीवरून फिरत असताना एका फिलीपिन्स नागरिकाने सुसाट वेगात टोयोटा हिलक्स ट्रकने परेरा दाम्पत्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची दुचाकीवरील जेरॉल्ड व प्रिया यांना जोरदार धडक बसली. परेरा दाम्पत्याची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली. बाडियान जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रिया परेरा यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
तर गंभीर जखमी जेराल्ड यांना मांडौ शहरातील चोंग हुआ रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह वसईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परेरा यांचे नातेवाईक फिलीपिन्स येथे गेले आहेत. जेरॉल्ड आणि प्रिया परेरा यांच्या पश्चात मुलगा तनिष (वय २०), मुलगी त्रिशा (१७) असा परिवार आहे. या घटनेने वसईमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
