चाळीसगाव: जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ भरधाव आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ सख्ख्या भावांचा समावेश आहे. एकाच गावातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात सोमनाथ संजय वराडे (वय ३२), सागर संजय वराडे (वय २६) आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार (३०) या तिघांचा मृत्यू झाला. तिघेही जण होंडा शाईन मोटार सायकल क्र. MH 05 Z 8909 या दुचाकीवरून तळेगाव येथून हिरापूरकडे येत होते. त्यावेळी तळेगांवकडून हिरापूरला येत असतांना रात्री 09.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव कडून नांदगांवकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रक क्र. MH 04 HY 7208 चे वरील चालकाने ट्रक बेदकारपणे, भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.
advertisement
घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेनं ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं पाठवण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी तपासून सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार यांना मयत घोषित केलं. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात वराडे कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.
संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको आंदोलन
दरम्यान, या घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर तात्काळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीवर गावकरी ठाम असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
