मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर भाजपनं आपलं मिशन बीएमसीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच भाजपने भाकरी फिरवली आहे. विद्यमान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याऐवजी आता नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
advertisement
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज सकाळी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
आशिष शेलार यांच्या नेतृत्वात 2017 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त यश मिळाले होते. शेलार यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर आता त्यांना पदमुक्त करण्यात आले असून अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची निवडीचा तिढा सुरू होता. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा धुरा देण्याबाबत चर्चा सुरू होती. तर, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, अमित साटम यांची नावे चर्चेत होती. अखेर भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीने साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
कोण आहेत अमित साटम?
अमित साटम हे तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. भाजपच्या स्थानिक पातळीवरील जबाबदारी पार पाडल्या आहेत. यामध्ये युवा मोर्चा पदाधिकारी, भाजप आंबोली विधानसभा अध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडल्या आहे. 2004 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून अमित साटम हे राजकारणात आले. कोरोना काळात महाविकास आघाडी खास करून मातोश्री आणि ठाकरेंवर थेटपणे टीका करत अनेक मुद्यांवर शिवसेनेला साटम यांनी सभागृहात आणि बाहेर घेरलं होतं. महापालिका - स्थानिक प्रशासन यासोबतच मुंबईच्या संघटनात्मक बांधणीवर साटम यांची चांगली पकड आहे.