मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आज पहिली स्वतंत्र बैठक पार पडणार आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष म्हणून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवार निश्चिती आणि प्रचार रणनीती यावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'न्यूज १८ लोकमत'ला दिली आहे. भाजपासोबत आज होणाऱ्या पहिल्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत ( डॉक्टरांनी परवानगी दिल्यास उपस्थित राहतील) राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे आणि सिद्धेश कदम उपस्थित राहणार. भाजपातर्फे आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर उपस्थित असणार आहेत.
advertisement
भाजपचा १५० जागांचा आग्रह, शिंदेंना किती जागांची ऑफर?
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप जवळपास १५० हून अधिक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेना शिंदे गटासाठी ७० ते ८० जागा सोडण्यास भाजप तयार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भाजपच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) साठी २ ते ३ जागा देण्याचाही प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या नगरसेवकांवरून महायुतीत वादाचा खडा?
आजच्या बैठकीत २०१७ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेतून निवडून आलेले आणि नंतर शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक यांच्याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही, यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मात्र, ठाकरे गटाकडे सध्या असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदे गटाला देण्यास भाजप अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चेदरम्यान वादावादी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुस्लिम बहुल प्रभाग शिंदे गटाकडे?
दरम्यान, मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये शिंदे गटाकडे प्रभावी आणि तगडे उमेदवार असल्यास त्या जागांवरही स्वतंत्रपणे चर्चा करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक सहमती होण्याची शक्यता आहे. स्थानिक समीकरणे आणि उमेदवारांची ताकद पाहून अशा प्रभागांमध्ये लवचिक भूमिका ठेवली जाण्याची शक्यता आहे.
याच बैठकीत मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या एकत्रित प्रचाराची रणनीती ठरवली जाणार असून, प्रचाराचा आराखडा, जबाबदाऱ्या आणि समन्वय यावरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर येणार का, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
