भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई अध्यक्षपदी साटम यांच्या नावाची घोषणा केली. आज सकाळी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात 2017 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त यश मिळाले होते. शेलार यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर आता त्यांना पदमु्क्त करण्यात आले असून अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
advertisement
कोण आहेत अमित साटम?
अमित साटम हे तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. भाजपच्या स्थानिक पातळीवरील जबाबदारी पार पाडल्या आहेत. यामध्ये युवा मोर्चा पदाधिकारी, भाजप आंबोली विधानसभा अध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडल्या आहे. 2004 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून अमित साटम हे राजकारणात आले.
भाजपची आक्रमक रणनीती?
अमित साटम यांची नियुक्ती करत भाजपने आक्रमक रणनीती आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमित साटम हे विधानसभेत आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. संघटनात्मक पातळीवर त्यांची चांगलीच पकड आहे. त्याचा फायदा भाजपला या निवडणुकीत होऊ शकतो.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडल्यानंतर मुंबई महापालिकेत सत्ता टिकवण्याचे आव्हान ठाकरेंसमोर आहे. अशातच आता साटम यांच्यामुळे ठाकरेंच्या बीएमसी निवडणुकीत आणखी आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंची कोंडी करणारी खेळी...
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्भुमीवर भाजपचा आक्रमक चेहरा अमित साटम यांची अध्यक्षपदी निवड झाली. कोरोना काळात महाविकास आघाडी आणि विशेषत: मातोश्रीवर टीका करत अनेक मुद्यांवर शिवसेनेला साटम यांनी सभागृहात आणि बाहेर घेरलं होतं. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन वादग्रस्त मृत्यू प्रकरणात अमित साटम यांनी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आक्रमक नेतृत्व दिल्याने आता आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाची दमछाक होणार आहे. त्याशिवाय, साटम हे मराठी असल्याने मराठीचा मुद्दाही त्यांच्याविरोधात फारसा प्रभावी ठरणार नसल्याचे चिन्ह आहे.
मुंबई महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील 'मातोश्री'विरोधात आरोपांचा धुरळा उडवला होता. वांद्रेतील माफिया संबोधत सोमय्या यांनी ठाकरे यांनाच अंगावर घेतले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती राज्यात सत्तेवर होती. आता, ठाकरे गट आणि भाजप हे आमनेसामने असून आरोपांना चांगलीच धार येणार आहे.
