भाजपचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचा प्रयत्न
राहुरी मतदारसंघ हा मागील काही निवडणुकांपासून भाजपचा मजबूत गड मानला जातो. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने येथे आपले वर्चस्व टिकवले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही परंपरा कायम ठेवण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. ते सध्या ‘शिव निर्धार यात्रा’च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत.
advertisement
विरोधकांची हालचाल सुरू
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मतदारसंघात ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांनी अद्याप निवडणूक लढवण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचा इतिहासही महत्त्वाचा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करत मतदारसंघ जिंकला होता. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्री झाले. मात्र, स्थानिक पातळीवर अपेक्षित वर्चस्व निर्माण करण्यात ते कमी पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
2024 च्या निवडणुकीत मात्र शिवाजीराव कर्डिले यांनी पुनरागमन करत तनपुरे यांचा तब्बल 34 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीची वेळ आली आहे.
साखर कारखान्यावरून नाराजी
राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हा स्थानिक राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. या कारखान्यावर सुमारे 600 कोटी रुपयांचे कर्ज आहे. संचालक मंडळाची निवडणूक जिंकून तनपुरे गटाने कारखान्याचा ताबा घेतला असला, तरी अद्याप तो सुरू करण्यात अपयश आले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते.
राजकीय समीकरणांमध्ये बदल
कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तनपुरे कुटुंबातील काही सदस्यांनी राजकीय भूमिका बदलल्याचेही बोलले जात आहे. विशेषतः अरुण तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेमुळे स्थानिक समीकरणांवर परिणाम झाला आहे.
नगरपालिकेतील ताकद कायम
राहुरी नगरपालिकेत मात्र प्राजक्त तनपुरे यांनी आपली ताकद टिकवून ठेवली आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी 17 जागा जिंकत सत्ता राखली. भाजपला येथे मर्यादित यश मिळाले. मात्र, या विजयासाठी तनपुरेंना पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागल्याचेही विश्लेषक सांगतात.
लक्ष तनपुरेंच्या निर्णयाकडे
अक्षय कर्डिले यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीत थेट कर्डिले विरुद्ध तनपुरे असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
