शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, तासाभरात 40 लाखांचा चिखल, ‘त्या’ काळरात्रीमुळं सगळेच हतबल!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: गारांच्या तडाख्याने द्राक्षांचे घड जमिनीवर पडले, वेली तुटल्या आणि अनेक महिन्यांच्या कष्टावर पाणी फिरले.
सोलापूर - शेतकरी जेव्हा एखादे पीक लावतो, तेव्हा तो केवळ बियाणे पेरत नाही, तर आपली स्वप्नं पेरतो. मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात निसर्गाने पुन्हा एकदा बळीराजावर घाला घातला आहे. शेतकरी बाबासाहेब कारंडे यांनी पाच एकरात जपलेली द्राक्ष बाग सोमवारी रात्री झालेल्या गारपिटीने अक्षरशः उद्ध्वस्त झाली. ज्या बागेला त्यांनी एखाद्या लहान लेकराप्रमाणे जपलं होतं, तीच बाग तासाभरात उद्ध्वस्त झाली.
घरातील गरजा कमी करून, स्वतःच्या सुखाला बाजूला ठेवून कारंडे यांनी द्राक्ष बागेची काळजी घेतली. द्राक्ष बागेसाठी खत, पाण्याला कधीही तडजोड केली नाही. भुरी, करपा यांसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी केली.
12 हजारांचे औषध आणले आणि..
गारपिटीच्या आदल्या दिवशीच 12 हजार रुपयांचे औषध आणून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी फवारणी करून बाग अधिक सुरक्षित करायची त्यांची योजना होती. पण निसर्गाने एका रात्रीत सगळे हिरावून घेतले. द्राक्ष बाग जगवण्यासाठी दुसऱ्याकडून घेतलेल्या पैसे कसे द्यायचे हा प्रश्न आता बाबासाहेबांना पडला आहे.
advertisement
वेली तुटल्या, घड जमिनीवर
गारांच्या तडाख्याने द्राक्षांचे घड जमिनीवर पडले, वेली तुटल्या आणि अनेक महिन्यांच्या कष्टावर पाणी फिरले. अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने कारंडे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. उभ्या पिकाचे असे झालेले नुकसान पाहताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
जगायचे कसे?
“आम्ही जगायचे कसे?” हा एकच प्रश्न त्यांच्या ओठांवर आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी, अशी आर्त मागणी कारंडे यांनी केली आहे. कारण या बागेसोबतच त्यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, तासाभरात 40 लाखांचा चिखल, ‘त्या’ काळरात्रीमुळं सगळेच हतबल!








