भारतीय जनता पक्षातर्फे रवी लांडगे यांची महापौर पदासाठी निवड करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपला अर्ज देखील दाखल केला. मात्र उपमहापौर पदासाठी भाजपकडून चर्चेत असलेल्या शितल शिंदे यांनी पद घेण्यासाठी नकार दिल्यानंतर ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजप नेत्यांवर आली. अखेर भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका शर्मिला बाबर यांनी उपमहापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला.
advertisement
तर दुसरीकडे स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून आपण महापौर पदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर अचानक राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजप बरोबर राष्ट्रवादी देखील सत्तेत बसेल का? या चर्चेला उधाण आले.
अजितदादा गेले, महापौरपदाच्या निवडीनंतर जल्लोष-आनंद साजरा करणार नाही
याचबाबत भाजपचे गटनेते प्रशांत शितोळे यांना विचारले असता, शहराचा एकत्रित विकास करण्यासाठी राष्ट्रवादीला आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत, असे त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट केले. तर स्वर्गीय अजित पवार यांच्यावरील धार्मिक विधी बाकी असल्याने शिष्टाचार पाळत महापौरपदाच्या निवडीचा किंवा सत्ता आल्याचा कोणताही जल्लोष किंवा आनंद साजरा करण्यात येणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी-भाजप सत्तेत एकत्र बसण्याच्या हालचाली
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीचा संघर्ष झाला. दिवंगत नेते अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील वाकयुद्ध राज्यात गाजले. अखेर या लढाईत महेश लांडगे यांची सरशी झाली. आता अजित पवार यांच्या माघारी दोन्ही पक्षात संघर्ष नको असे मानून महापालिकेत सत्तेत एकत्र बसण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते.
