भाजपात गटबाजी नसल्याचा दावा केला जातो. मात्र, चंद्रपूरमध्ये ही गटबाजी उफाळून आल्याचे दिसले. चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली. तर, जोरगेवार यांनी भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम कन्यका सभागृहात आयोजित केला होता.
advertisement
आमदार जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी हजेरी लावली होती. या वेळी त्यांचा पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या संघर्षासाठी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
आपली काँग्रेस झाली का... फडणवीस काकूंनी टोचले कान...
आमदार जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शोभाताई फडणवीस यांनी आपल्या भाषणात पक्षातील गटबाजीवर बोट ठेवले. एकाच शहरात भाजपच्या स्थापना दिनाचे दोन कार्यक्रम का घेतले? आपली काँग्रेस झाली का? असा सवाल त्यांनी केला. जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं, छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका असे बोलत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचेही कान टोचले.