विशाल सोनी असं मृत्यूचा बनाव रचणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाचं नाव आहे. तो राजगढचे भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सोनी याच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशालने मृत्यूचा बनाव रचून गुन्हेगारी कट केला होता. तरीही त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. पहाटे पोलिसांना कालीसिंध नदीत एक कार बुडाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि काही मच्छिमारांच्या मदतीने कार बाहेर काढली, परंतु आत कोणीही नव्हते. ती कार भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल याची असल्याचे निष्पन्न झाले, जो बेपत्ता होता.
त्यानंतर, राजगढ येथून एसडीईआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. विशालच्या वडिलांनी पोलिसांवर शोधकार्यात सहकार्य न केल्याचा आरोपही केला, त्यानंतर तीन वेगवेगळ्या पथकांनी २० किलोमीटरच्या परिसरात त्याचा शोध घेतला.
कॉल डिटेल्सवरून विशालचे लोकेशन महाराष्ट्रात आढळलं
आठ दिवसांपर्यंत विशाल सोनीचा कोणताही थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना संशय आला. यामुळे पोलिसांनी विशालचा मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मिळवला, ज्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील लोकेशन उघड झाले. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने, संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलिस स्टेशन परिसरात विशालला अटक करण्यात आली.
विशालने स्वतःच्या मृत्यूचा कट का रचला?
पोलीस चौकशीदरम्यान विशालने उघड केले की त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन सार्वजनिक वाहने आहेत. त्याच्यावर १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिकचं कर्ज होते, जे तो फेडू शकला नाही. त्याने सांगितले की त्याच्या कुटुंबाने त्याला सल्ला दिला होता की जर त्याने मृत्यू प्रमाणपत्र मिळवले तर बँकेचे कर्ज माफ केले जाईल.
यातूनच विशाल स्वत:च्या अपघाती मृत्यूचा कट रचला. याबाबत विशालने पोलिसांना सांगितलं की, "५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता, मी इंदूर रोडवरील गोपाळपुरा जवळील एका ढाब्यावर उभ्या असलेल्या माझ्या ट्रकमधून भाडे घेतले आणि नदीकाठी परतलो. मी चालत्या गाडीचे हेडलाइट बंद केले. मी गाडीतून उतरलो आणि गाडी नदीत ढकलली. पूल पॅरापेटशिवाय असल्याने गाडी नदीत पडली. मी माझ्या एका ड्रायव्हरच्या बाईकवरून ढाब्यावर परतलो आणि इंदूरला जाणाऱ्या बसमध्ये चढलो."
...अन् महाराष्ट्रात पलायन केलं
विशालने सांगितले की दुसऱ्या दिवशी, वर्तमानपत्रात त्याच्या मृत्यूबद्दल वाचल्यानंतर, तो महाराष्ट्राला पळून गेला. तेथे तो शिर्डी आणि शनी शिंगणापूरमध्ये फिरत राहिला. जेव्हा त्याला कळले की त्याचा कट उघडकीस आला आहे, तेव्हा त्याने स्वत:च्या अंगावरील कपडे फाडले, धुळीत लोळला आणि अपहरणाची कहाणी रचली आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी विशालच्या वडिलांची आणि भावांची कठोर चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी विशाल नातेवाईकांच्या घरी असू शकतो, असा संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी सीडीआर काढून विशालला पकडलं. पण या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी आकांक्षा हाडा यांनी सांगितले की, स्वतःच्या मृत्यूचा कट रचणे आणि १० दिवस शोध घेऊन पोलीस प्रशासनाला त्रास देणे, यासाठी शिक्षेची कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. म्हणून, त्या तरुणाला त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले.