निवडणुका पार पडलेल्या महापालिकांमध्ये भाजप महायुतीला यश मिळाले असले तरी मुंबईतील निकालांनी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या जास्त जागांमुळे भाजपच्या एकूण 'स्ट्राइक रेट'वर परिणाम झाला असून, मुंबईत भाजपचे मोठे नुकसान झाल्याचा दावा पक्षातील स्थानिक नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याच्या नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
भाजप नेत्यांचे केंद्रीय नेतृत्वाला साकडे
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जागावाटपात एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने घेतलेल्या जागांवर शिवसेनेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. "जर भाजपने अधिक जागा लढवल्या असत्या, तर एकट्या भाजपने १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या," अशी स्पष्ट भूमिका राज्यातील नेत्यांनी हायकमांडसमोर मांडली आहे. केवळ शिंदेंच्या आग्रहामुळे भाजपला मर्यादित जागांवर लढावे लागले, ज्याचा परिणाम युतीच्या एकूण कामगिरीवर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंदेंच्या स्ट्राईक रेटचा फटका...
निवडणुकीच्या निकालांची आकडेवारी पाहिली असता, भाजप आणि शिवसेनेच्या स्ट्राइक रेटमधील तफावत स्पष्टपणे दिसून येते. भाजपने १३५ जागा लढवल्या आणि ८९ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेना शिंदे गटाने ९० जागा लढवून केवळ २९ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या कमी स्ट्राइक रेटमुळे युतीला स्पष्ट बहुमताऐवजी 'काठावरचे बहुमत' मिळवण्यावर समाधान मानावे लागले असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले.
'हॉटेल पॉलिटिक्स'वरूनही नाराजीचा सूर
केवळ जागावाटपच नाही, तर निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून झालेल्या 'हॉटेल पॉलिटिक्स'वरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मित्रपक्षाच्या या कार्यपद्धतीमुळे महायुतीच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याची भावना काही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत महापौर कोणाचा?
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरील दावा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. पक्षाने अनेक संघर्ष करून विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ही संधी सोडायची नसल्याचे मत व्यक्त केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या या भूमिकवर शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
