मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ४० ते ४५ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले असून, मुंबई महानगर क्षेत्रातील पालिकांसाठी ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी देशभरातील स्टार प्रचारकांची फौज उतरवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रचार मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि नामवंत प्रचारक सहभागी होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या प्रमुख शहरांवर भाजपचा विशेष भर राहणार आहे.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ पुरस्कारप्राप्त आचार्य श्री रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी लिहिलेल्या ५०० व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन समाजातील मतदारांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील उत्तर भारतीय मतदारांचा विचार करता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते मनोज तिवारी, रवी किशन, गायक निरहुआ आणि मैथिली ठाकूर यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी दहा दिवसांत तब्बल ४० ते ४५ प्रचारसभा घेणार आहेत. दिवसाला सरासरी चार सभा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या प्रचाराला मोठा वेग मिळणार आहे. याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी अशाच पद्धतीने प्रचाराचा झंझावात उभा केला होता.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महापालिकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या किमान तीन ते चार सभा होणार असून, लहान महापालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा आयोजित केली जाणार आहे. भाजपचा हा मेगाप्लॅन निवडणुकीच्या रणधुमाळीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
