कपड्याच्या पुरचुंडीमध्ये बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू, गुलाल तसेच काळे उडीद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या साहित्यासोबत एका चिठ्ठीत परिसरातील ‘टॉप’ बैलांची नावे आणि त्या बैलांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली आढळून आली. या चिठ्ठीतील मजकूर पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले.
बैलांवर भानामतीचा प्रकार?
ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली. बैल शर्यतींमध्ये भादोले गावाची ओळख असून येथे अनेक नामांकित आणि विजेते बैल आहेत. त्यामुळे अशा प्रकारे थेट स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापासह चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
चिठ्ठीतील नावे उघड झाल्यानंतर संबंधित बैलमालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. आपल्या बैलांना काही होईल का? शर्यतींवर याचा परिणाम होईल का? अशा अनेक प्रश्नांनी बैलमालक धास्तावले आहेत. काही नागरिकांनी हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, या प्रकारामागे नेमके कोण आहे, हा केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की प्रत्यक्षात कोणाच्या तरी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे भादोले गावात अंधश्रद्धा, स्पर्धात्मक द्वेष हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
