राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेसशीदेखील चर्चा सुरू आहे. काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंशी फारकत घेतली असून वेगळी चूल मांडली आहे. काँग्रेसने समाजवादी पक्ष, डाव्या आघाडीसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटानेदेखील काँग्रेसकडे आपल्या जागांचा प्रस्ताव सादर केला आहे.
कुठं अडलाय पेच?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा पेच विक्रोळी–भांडूप परिसरात अडकला आहे. येथील अवघ्या दोन वॉर्डांवरून युतीची चर्चा रखडली असून, आज होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक १११ हा धनंजय पिसाळ यांच्यासाठी आणि वॉर्ड क्रमांक ११९ हा मनिषा रहाटे यांच्यासाठी शरद पवार गटाला हवा आहे. दोघेही या-या वॉर्डमधून माजी नगरसेवक राहिले असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने या दोन जागांना प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे.
मात्र, ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत वॉर्ड क्रमांक ११९ हा मनसेला देण्यात आल्याने हा पेच वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी असून, या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आणखी काही वॉर्डवर दावा...
याशिवाय शरद पवार गटाने वॉर्ड क्रमांक १२४ आणि १६८ यांच्यावरही दावा केला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या वॉर्डमधून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र सध्या हे नगरसेवक अन्य पक्षात गेल्याने या जागांवरूनही चर्चेला धार आली आहे.
विक्रोळी–भांडूपमधील या चार वॉर्डांवरून निर्माण झालेला वादच ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील युतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचं चित्र आहे. आजच्या बैठकीत या मुद्द्यावर समन्वय साधला गेला, तर मुंबईतील आघाडीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.s
