मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे. तर, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती झाली असून अजित पवार स्वतंत्रपणे लढत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावर बरेच दिवस चर्चा सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना फोनवरून एबी फॉर्म घेण्याची सूचना करण्यात आली होती. यादी जाहीर न झाल्याने गोंधळ दिसून आला होता.
advertisement
महायुतीला धक्का...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते अक्षरशः जीवाचं रान करत असतानाच, भाजपच्या एका महिला उमेदवाराची संधी अवघ्या १५ मिनिटांच्या उशिरामुळे हुकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील वॉर्ड क्रमांक २१२ मधून घडली आहे. भाजपाकडून अधिकृत एबी फॉर्म मिळालेल्या मंदाकिनी खामकर या उमेदवार अर्ज भरण्यासाठी पोहोचल्या होत्या. मात्र, अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ संपल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांनी त्या निवडणूक कार्यालयात पोहोचल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामी, भाजपाकडून मिळालेली उमेदवारी असूनही मंदाकिनी खामकर यांची निवडणुकीतील संधी पूर्णपणे हुकली.
तर, दुसरीकडे वॉर्ड क्रमांक २११ मध्येही महायुतीचा कोणताही उमेदवार नसल्याची माहिती समोर आली आहे. या जागेवरील उमेदवाराकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे. या दोन जागांवर आता महायुतीला एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार आहे. तर, दुसरीकडे तूर्तास ठाकरे बंधूंच्या उमेदवाराचे या दोन प्रभागात पारडं काहीसं जड झालं आहे.
