काँग्रेस आणि वंचित सोबत जागावाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आधी नाराज असलेल्या या 16 बंडखोर उमेदवारांवर आता पक्ष त्यांचाच मागे ठाम उभे राहण्याच्या भूमिकेत आहे. काँग्रेसने त्या १६ जागांवर आता आपल्या बंडखोरांना साथ देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणूकिसाठी वंचित सोबत काँग्रेसने युती केली. जागावाटप झालं आहे असं वाटत असताना वंचित आणि काँग्रेस मधील जागा वाटपाचा पेच समोर आला. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी 16 जागा काँग्रेसला परत करण्यात आल्या आणि या 16 जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आले नाही. यावरून काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली होती.
advertisement
विशेषतः प्रभाग क्रमांक ६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, ३०, ४६, ११७, १५३, १७७, १८२, १९५ आणि १९८ या १६ प्रभागांमध्ये काँग्रेसला उमेदवार देता आले नाही. त्यामुळे या भागत काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. मात्र, या बंडखोरीकडे आता काँग्रेस पक्षाने सकारात्मक पद्धतीने पाहिले आहे. आता वंचितसोबतच्या आघाडीमुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. त्यांनाच आता काँग्रेस पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. या बंडखोरांमुळे काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या पुन्हा मैदानात असणार असल्याचे म्हटले जात आहे.
'वंचित'ने ऐनवेळी घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेसने आपल्या बंडखोर उमेदवारांना आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय तर घेतला आहे. मात्र काही ठिकाणी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
