नेमकं काय झालं?
वॉर्ड १०७ ची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला. नील सोमय्या बिनविरोध निवडून येणार अशा चर्चा सुरू झाली. तर, नील सोमय्या यांचे वडील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाला डिवचताना दोन्ही बंधूंचा उमेदवार नसल्याचे सांगितले. तगडा उमेदवार नसल्याने नील सोमय्यांच्या विजयाची औपचारिकता असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गट अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. या निवडणुकीत जाधवांच्या पाठिशी ठाकरे गट, मनसे यांचा पाठिंबा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिनेश जाधवांनी काय सांगितलं?
दिनेश जाधव यांनी आपण ३० डिसेंबर रोजीच अर्ज भरून ठेवला असल्याचे सांगितले. ठाकरे गटाकडून पाठिंबा जाहीर होताच दिनेश जाधव यांनी नील सोमय्यांवर तोफ डागली आहे. "नील सोमय्यांनी अनेकांना दमदाटी केली आहे, पण मला घाबरवण्याची हिंमत त्यांच्यात नाही," असे खुले आव्हान जाधवांनी दिले आहे. काही गुजराती आणि अपक्ष उमेदवारांना घाबरवून नील सोमय्यांना ही जागा 'बिनविरोध' जिंकायची होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
त्यासाठीच फॉर्म भरून ठेवला होता...
दिनेश जाधव म्हणाले की, "हा प्रभाग मराठी बहुल आहे. निवडणूक आयोगाची सध्याची कार्यपद्धती आणि सुरू असलेली दादागिरी पाहता राष्ट्रवादीचा अर्ज बाद होऊ शकतो, याची मला शंका होती. म्हणून मी आधीच तयारी केली होती, असे जाधव यांनी सांगितले. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, १० वर्षे शाखाप्रमुख आणि ८ वर्षे उपविभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. इथली जनता मराठी अस्मितेसाठी मलाच साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
