निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदार यादीही प्रसिद्ध केली जाते. मात्र, प्रत्येक निवडणुकीवेळी या यादीत बदल होत असल्याने अनेकदा काही मतदारांची नावे गहाळ झाल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे आधीच तपासणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच, मतदान ओळखपत्र नसेल तर कोणत्या पर्यायी कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येईल, याचीही माहिती मिळवता येते. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिली असून, ती घरबसल्या काही मिनिटांत पूर्ण करता येते.
advertisement
>> मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदारांना आपलं नाव मतदार यादीत शोधता यावं तसेच मतदान केंद्राची माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे.
१. सर्वप्रथम voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
२. वेबसाईटच्या वरच्या बाजूला नाव शोधण्यासाठी तीन पर्याय दिलेले असतात –
* EPIC (मतदान ओळखपत्र) क्रमांकाद्वारे
* वैयक्तिक माहितीच्या आधारे (Search by Details)
* मोबाईल नंबरद्वारे
३. ‘Search by Details’ हा पर्याय निवडल्यास, राज्य, भाषा, पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती अचूक भरा.
४. त्यानंतर खाली दिलेला **कॅप्चा कोड** टाईप करून ‘Search’ वर क्लिक करा.
५. जर तुमचं नाव मतदार यादीत असेल, तर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. ‘View Details’ वर क्लिक करून तपशील पाहता येईल.
६. येथे तुमचं नाव, मतदान केंद्र (Polling Station), भाग क्रमांक आणि अनुक्रमांक अशी महत्त्वाची माहिती उपलब्ध होते.
७. शेवटी ‘Print Voter Information’ या पर्यायावर क्लिक करून मतदानाची माहिती असलेली पीडीएफ डाऊनलोड करता येते. ही प्रिंट मतदानाच्या दिवशी ओळख म्हणून सोबत ठेवता येईल.
वेळेआधी ही प्रक्रिया पूर्ण केल्यास मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ टाळता येणार असून, तुमचा मतदानाचा हक्क सुरक्षितपणे बजावता येईल.
