प्रभाग क्रमांक १८४ आणि १६७ मध्ये हे प्रकर्षाने दिसून आले आहे. या दोन्ही प्रभागांतील प्रचार पत्रकांमध्ये नेतेमंडळी, पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांची छायाचित्रे ठळकपणे छापण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवार असलेल्या महिलांचे फोटो मात्र गायब आहेत. त्यामुळे या प्रचारपद्धतीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
साधारणपणे मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी, त्यांच्या कार्याची माहिती मिळावी आणि मतदानाचे आवाहन करता यावे, यासाठी प्रचार पत्रकांमध्ये उमेदवाराचे छायाचित्र, नाव व तपशील दिला जातो. मात्र काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक १६७ आणि १८४ मध्ये सुरू असलेला प्रचार या पारंपरिक पद्धतीला छेद देणारा ठरत आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक १८४ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक बब्बू खान यांच्या पत्नी साजिदा बब्बू खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १६७ मधून अरशद आजमी यांच्या कन्या समन अरशद आजमी यांना संधी मिळाली आहे. महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे या दोन्ही प्रभागांत महिला उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रचारात उमेदवारांऐवजी त्यांच्या पती किंवा वडिलांची छायाचित्रे वापरण्यात आल्याने हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मुंबईत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्षा गायकवाड या महिला नेत्या आहेत. तसेच इंदिरा गांधी यांनी देशाचे पंतप्रधानपद कणखरपणे सांभाळून नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला उमेदवारांचेच फोटो प्रचारातून गायब असणे, हा प्रश्न पक्षांतर्गत आणि बाहेरही आश्चर्य व टीकेचा विषय ठरत आहे.
