वरळी पोलीस ठाण्यात मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि वरळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाचे पदाधिकारी आकाश सोनावणे यांना वरळी पोलीस ठाण्याकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले. संबंधित पदाधिकाऱ्याची नेमकी चूक काय, असा थेट सवाल त्यांनी पोलिसांना केला. कोणताही ठोस गुन्हा नसताना तडीपारीसारखी कठोर कारवाई का करण्यात आली, असा जाबही सावंत यांनी विचारला.
advertisement
यावेळी “कायदा व सुव्यवस्था तुमच्या हातात आहे म्हणून मनमानी कारभार करणार का? हुकूमशाही लागून गेलीय का” असा संतप्त प्रश्न उपस्थित करत अरविंद सावंत यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ पोलीस ठाण्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून याबाबत नेमकी काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
