मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर आपला विश्वास कायम ठेवला असल्याचे निकालातून दिसून आले. कांदिवलीपासून मलबार हिलपर्यंत पसरलेल्या गुजरातीबहुल पट्ट्यात भाजपला ९० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहे. या मतपेढीच्या जोरावर भाजपने मुंबईत मोठी मुसंडी मारली आहे. जवळपास ४० ते ४५ जागा याच भागातील आहेत.
उत्तर मुंबई आणि उपनगरांत भाजपचा गड मजबूत
advertisement
मुंबईत २० टक्क्यांहून अधिक गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या आहे. निवडणूक निकालांचे विश्लेषण केले असता, जिथे या मतदारांचे प्राबल्य आहे, तिथे भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. प्रामुख्याने कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड आणि मलबार हिल या भागांत भाजपने विरोधी पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. या भागातील ९० टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडल्याने या प्रभागांमध्ये भाजपला कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
शिवसेनेलाही युतीचा फायदा
या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युती असल्याने, गुजराती मतांचा फायदा शिवसेनेलाही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गुजरातीबहुल भागातील शिवसेनेच्या उमेदवारांना या मतदारांनी मनापासून साथ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. युतीची रणनीती या भागात यशस्वी ठरली असून मतांचे विभाजन टाळण्यात भाजप-शिवसेनेला यश आले आहे.
