मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून मतमोजणीच्या फेऱ्यागणिक मोठा उलटफेर होत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलात महायुती आघाडीवर असून ठाकरे गट-मनसे हे पिछाडीवर आहेत. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर-पोतनीस यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement
शिंदे गटाच्या दिप्ती वायकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी पराभव केला. रविंद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभेत पत्नी आणि आता बीएमसीमध्ये मुलगी पराभूत झाली.
यापूर्वी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही याच परिसरात अत्यंत निसटता पराभव झाला होता. दीप्ती वायकर यांच्या रूपाने वायकर कुटुंबाने पुन्हा एकदा या मतदारसंघावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मतदारांनी त्यांना कौल दिला नाही.
जोगेश्वरी पूर्व हा भाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. इथे ठाकरे गटाच्या उमेदवाराने दीप्ती वायकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते.
राहुल शेवाळे यांनीही धक्का
वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा १४५० मतांनी पराभव केला. शिंदे गटाने या वॉर्डमधून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शेवाळे यांना हा मोठा धक्का आहे. वैशाली शेवाळे या माजी नगरसेविका आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या पारुबाई कटके यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
