बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५– २६ अंतर्गत १५ जानेवारी २०२६ ला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात सुरू आहे. सुरुवातीच्या कलात भाजप-शिंदेसेनेला ठाकरे बंधूंनी तगडी टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुती अगदी १५० जागा पार करेल, असे सांगितले होते. मात्र ठाकरे सेना भाजप-शिंदेसेनेला टक्कर देत असल्याचे चित्र आहे.
advertisement
शिंदेसेनेच्या कुणाकुणाचा पराभव?
खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर पोतनीस यांचा वॉर्ड क्रमांक ७३ मधून पराभव झाला. धारावी वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा १४५० मतांनी पराभव केला. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वैशाली शेवाळे या वहिनी आहेत. तसेच प्रभादेवीमधील वॉर्ड १९४ मध्ये मोठा उलटफेर झाला. समाधान सरवणकर यांना पराभवाचा झटका बसला.
नवाब मलिक यांचे बंधू 'कॅप्टन' पराभूत
नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा वॉर्ड क्रमांक १६४ मध्ये पराभव झाला. निवडणूक जिंकण्यासाठी मलिक यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र या प्रभागात काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली.
डॅडी अरूण गवळींची लेक पराभूत
डॅडी अरूण गवळींची लेक गीता गवळी पराभूत झाली आहे. भायखळा आणि दगडी चाळीतील मोठे प्रस्थ असलेले गवळी कुटुंबाला मतदारांनी नाकारले. गीता गवळी याआधी नगरसेवक राहिल्या आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांचा पराभवाचा झटका दिला.
