मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधीच मतमोजणीत 'पाडू'चा वापर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावर ठाकरे बंधूंनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडांमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी अखेर 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा आधार घ्यावा लागला. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध दर्शवला होता. मात्र, घाटकोपर आणि कुर्ला या दोन प्रभागांतील अडकलेले निकाल याच यंत्राच्या मदतीने जाहीर करण्यात आले आहेत.
advertisement
नेमका वाद काय होता?
मतदान यंत्रात (EVM) बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने 'पाडू' यंत्राचा पर्याय निवडला होता. मात्र, हे यंत्र म्हणजे ईव्हीएममधील डेटा चोरण्याचा किंवा फेरफार करण्याचा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली होती. या तांत्रिक गोंधळातून मार्ग काढण्यासाठी अखेर या यंत्राचा वापर घाटकोपर प्रभाग १२५ आणि कुर्ला प्रभाग १५९ मध्ये करण्यात आला.
पाडूचा वापर, कोणाचा झाला विजय?
कुर्ला प्रभाग १५९:
प्रकाश मोरे यांचा विजय एल वॉर्डमधील कुर्ला प्रभाग १५९ मध्ये भाजपचे प्रकाश मोरे आणि काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांच्यात अटीतटीची लढत होती. दुसऱ्या फेरीत एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबवण्यात आली होती. इतर मशिनची मोजणी पूर्ण झाल्यावर दोन्ही उमेदवारांमध्ये ४८३ मतांचा फरक होता, तर बिघडलेल्या मशिनमध्ये ५३१ मते होती. या ५३१ मतांवरच जय-पराजयाचा फैसला अवलंबून होता. अखेर निवडणूक आयोगाच्या परवानगीने 'पाडू' यंत्राचा वापर करण्यात आला आणि त्यात भाजपचे प्रकाश मोरे सरस ठरल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
घाटकोपर प्रभाग १२५:
सुरेश आवळे यांची बाजी असाच प्रकार घाटकोपर येथील एन वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये घडला. येथेही ईव्हीएम सुरू होत नसल्याने मतमोजणीत अडथळा निर्माण झाला होता. येथेही प्रशासनाने 'पाडू' यंत्राच्या सहाय्याने आकडेवारी स्पष्ट केली आणि शिवसेनेचे (शिंदे गट) सुरेश आवळे यांनी विजय संपादन केला.
तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेले हे निकाल 'पाडू'मुळे मार्गी लागले असले, तरी आगामी काळात या यंत्राच्या वापरावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
