मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग ९० (कलिना) मध्ये शुक्रवारी दुपारी प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या उमेदवार ॲड. ट्युलिप मिरांडा यांनी भाजप उमेदवाराचा अवघ्या ७ मतांच्या फरकाने पराभव करत निसटता विजय मिळवला. या विजयानंतर भाजपने आक्षेप घेत तातडीने फेरमतमोजणीची मागणी केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
> निकालाचा थरार
सुरुवातीच्या मतमोजणीनुसार, काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांना ५,१९७ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार ज्योती उपाध्याय यांना ५,१९० मते मिळाली. मतांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने (फक्त ७ मते) उपाध्याय यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला आणि फेरमतमोजणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य करत पुन्हा मतमोजणी केली, मात्र दुसऱ्यांदाही मिरांडा यांच्या विजयावरच शिक्कामोर्तब झाले.
विजयानंतर भावूक झालेल्या ट्युलिप मिरांडा म्हणाल्या, "हा विजय माझ्या कष्टाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. विरोधकांनी पैसे वाटताना आम्ही रंगेहाथ पकडले होते, तरीही लोकांनी मला साथ दिली. या मोहिमेत त्यांचे पती आणि माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पदपथांवरील अतिक्रमणे, बेकायदा फेरीवाले आणि पार्किंगच्या समस्यांवर भर दिला होता.
या वॉर्डमधील निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराने लक्षणीय मते घेतली. तर, काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले, अपक्ष उमेदवार जॉन अब्राहम यांनी जवळपास १२०० हून अधिक मते घेतली. यामुळे या वॉर्डातील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.
