मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मुंबईत भाजपचा महापौर नको ही सगळ्यांची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे.
advertisement
शिंदे यांनी आपले नगरसेवक बंद ठेवले आहेत. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते. त्यांनी नगरसेवकही सूरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. नगरसेवकांसाठी हेच सुरक्षित शहर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती आहे. मात्र, भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं असल्याचे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे आहेत. त्यातही ते शिवसैनिक आहेत, त्यांनाही वाटत भाजपचा महापौर होऊ नये. त्यांच्याही मनात मराठी मनाची मशाल धगधगत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यांना कितीही कोंडलं तरी संपर्कासाठी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश कसाही पोहचवला जाऊ शकतो. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, असे जवळपास सगळ्यांनी ठरवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. जो शिवसैनिक असतो, त्याच्या मनात मुंबईबद्दल वेगळी भावना असते, असेही त्यांनी म्हटले.
पडद्यामागे बऱ्याच घडामोड, उद्धव-राज यांची चर्चा...
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, आम्ही या घटनेकडे तटस्थ होऊन पाहतोय. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. मात्र, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत असे वक्तव्य त्यांनी केले. बहुमत कितीही असो ते चंचल असत, इथून तिकडे जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
महायुतीचा महापौर बसणार असता तर नगरसेवक कोंडून नसते ठेवले, असा टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला. संजय राऊत यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात भाजपचा महापौर व्हावा, मुंबई भाजपला आंदण द्यावी, असे कोणालाही वाटणार नाही. विचारांसाठी बंड करण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच नाही असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.
