मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अखेर संपुष्टात आल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी मुंबई, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मुंबई महापालिकेमध्ये केलेल्या कामाच्या आधारे मतांचा जोगवा मागितला. मुंबईतील सत्ता गेली असली तरी मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंना साथ दिल्याचे चित्र आहे.
गिरणगावच्या बालेकिल्ल्यात मात्र ठाकरे बंधूंचे वर्चस्व अबाधित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील शिवडी आणि लालबाग पट्ट्यात ठाकरे गटाने आणि मनसेने (ठाकरे बंधूंनी) मिळून जोरदार मुसंडी मारली आहे.
advertisement
>> गिरणगावात 'ठाकरे' फॅक्टर जोरात!
मुंबईत भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी गिरणगावातील मतदारांनी मात्र ठाकरेंनाच पसंती दिली आहे. शिवडी आणि लालबाग विधानसभा क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या वॉर्डपैकी ५ वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंनी (शिवसेना UBT आणि मनसे) विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.
>> सहापैकी ५ वॉर्डात गुलालाची उधळण
गिरणगाव हा शिवसेनेचा आणि राज ठाकरेंच्या मनसेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मोठी ताकद लावली होती, मात्र निकाल वेगळाच लागला. शिवडी-लालबागमध्ये ६ पैकी ५ जागांवर ठाकरेंच्या उमेदवाराने बाजी मारली. महापालिका निवडणुकीच्या आधी या मतदारसंघात ठाकरेंना बंडखोरीलाही सामोरे जावे लागले होते.
शिवडी-लालबागमधील या विजयामुळे मुंबईच्या सत्तेचा चाव्या निसटल्या असल्या तरी, गिरणगावचा 'मराठी माणूस' अजूनही ठाकरेंसोबतच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेत महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता गेली आहे. मात्र, शिवडी आणि परळच्या या निकालाने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. गिरणगावात मिळवलेला हा विजय येणाऱ्या विधानसभेसाठी ठाकरे गटाचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे.
>> शिवडी-लालबागचा निकाल काय?
वॉर्ड क्रमांक 200: उर्मिला पांचाळ शिवसेना ठाकरे
वॉर्ड क्रमांक 201: इरम सिद्दीकी समाजवादी पार्टी
वॉर्ड क्रमांक 202: शिवसेना उबाठा उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव विजयी
वॉर्ड क्रमांक 203: श्रद्धा पेडणेकर शिवसेना ठाकरे
वॉर्ड क्रमांक 204: शिवसेना उबाठा किरण तावडे विजयी
वॉर्ड क्रमांक 205: मनसेच्या उमेदवार सुप्रिया दळवी विजयी
वॉर्ड क्रमांक 206: शिवसेना ठाकरे सचिन पडवळ विजयी
