मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, यावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडून मिळालेल्या स्पष्ट संकेतांनंतरच मुंबई काँग्रेसने ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याचा नारा अधिक ठामपणे पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधून मुंबईत महाविकास आघाडी एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे काँग्रेसने मात्र आपली स्वतंत्र भूमिका अधिक ठळक केली आहे. मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेस आता कोणत्याही दबावाखाली न जाता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांमुळे राज्यभरात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असून, विशेषतः मुंबई काँग्रेसच्या गोटात आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. या यशानंतर मुंबईत स्वबळावर उतरण्याचा निर्णय अधिक ठाम झाल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जात आहे.
आघाडी करून पायावर धोंडा नको...
नगरपंचायत आणि नगरपरिषद निकालांनंतर मुंबई काँग्रेसला मोठे बळ मिळाले असून, ‘मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याची गरज नाही,’ अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांनी उघडपणे मांडली आहे. मुंबईतील राजकारणात काँग्रेसला दुय्यम स्थानावर ढकलले गेले, असा सूरही अंतर्गत बैठकींमध्ये व्यक्त होत असल्याची माहिती आहे.
मुंबईत काँग्रेसची नवी समीकरणे?
मुंबईत काँग्रेसकडून लवकरच नव्या राजकीय समीकरणांची आणि संभाव्य युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवत असतानाच, स्थानिक पातळीवर अनुकूल ठरणाऱ्या नव्या युतींचे पर्यायही काँग्रेसकडून तपासले जात असून, येत्या काही दिवसांत मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली होती. या बैठकीत वंचितने मुंबईत २० टक्के जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.
