मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई ही सहजपणे पुसली जात नाही. त्यामुळे बोगस, दुबार मतदानाला आळा बसला जात असल्याचे म्हटले जात होते. अनेक दिवस ही मतदानाची शाई बोटावर राहते. मात्र, आज समोर आलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मतदानानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई यावेळी मार्कर पेनच्या स्वरूपात वापरण्यात येत असून, ही शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांनी केला आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
साईनाथ दुर्गे यांनी शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “शाई पुसली जात असल्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना, यावर लक्ष ठेवा. गाफिल राहू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या शाईबाबत निर्माण झालेल्या या चर्चेमुळे निवडणूक यंत्रणेची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
