शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक गट नोंदणी करण्यासाठी नवी मुंबईला रवाना झाले. मात्र नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांना संपर्क करूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. मात्र डॉ. सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या ६४ वर आली आहे.
advertisement
डॉ. सरिता म्हस्के कोण आहेत?
डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक १५७ मधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यांनी भाजपच्या आशा तायडे यांना पराभवाची धूळ चारली. चांदिवली परिसरातील प्रभाग क्रमांक १५७ मधल्या या लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. जवळपास १८०० मतांनी डॉ. सरिता म्हस्के यांनी आशा तायडे यांना पराभूत केले. सरिता म्हस्के या पेशाने डॉक्टर असून होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कोरोना काळात त्यांनी खूप चांगले काम केले. आपल्या कामांनी त्या जनतेत लोकप्रिय झाल्या.
स्थानिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमक होऊन व्यवस्थेशी दोन हात करतात. डॉ. सरिता म्हस्के यांनी २०१७ महापालिका निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे त्यांनी प्रभागात चांगले काम केले. आत्ताही महापालिका निवडणुकीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैधरित्या फ्लेक्स लावणार नाही, लावू देणार नाही, असे प्रचारकाळात सांगितले होते.
सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेनेकडून सुरू
आजच्या सेना भवनातील बैठकीला डॉ.सरिता म्हस्के गैरहजर राहिल्यानंतर आणि संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क होत नसल्याच्या कारणातून शिवसेना पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेनेकडून सुरू असल्याचे कळते.
