मुंबईतील ही निवडणूक अतिशय अटीतटीची असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळपासूनच मुंबईतील काही मतदार केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. तर, दुसरीकडे ईव्हीएम आणि मतदान केल्याच्या शाईचा घोळ असल्याचे दिसून येत आहे. ईव्हीएम बिघाडामुळे लालबागमध्ये मतदान उशिराने सुरू झाले. तर, दादरमधील वॉर्ड क्रमांक १९१ मधील ठाकरे गटाच्या उमेदवार विशाखा राऊत यांच्या नावासमोरील बटण दाबले जात नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचे ईव्हीएम बदलण्यात आले. या कारणाने येथील मतदान प्रक्रिया रखडली.
advertisement
यंदाच्या निवडणुकीतही मतदारयादीचा घोळ दिसून आला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या अवघ्या चार-पाच दिवसांपूर्वी मतदार यादी जाहीर केली. याच मतदारयादीत मोठा घोळ दिसून आला. यावर मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांकडे असलेल्या मतदारयादी आणि मतदान केंद्रात असलेल्या मतदारयादीत फरक असल्याने गोंधळाची स्थिती दिसून आली. काहींची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याची तक्रार दिसून आली होती.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक १४६ प्रभागात मतदान केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिक मतदाराने संताप व्यक्त केला. त्यांनी एकूण मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. शेजारी राहणाऱ्या मतदाराचं नावं मतदार यादीतून गहाळ झाल्याचा दावा करत मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलं मग आता नावं कसं नाही असा सवाल त्यांनी केला. तर, काही ठिकाणी मतदारांची नावे सापडली नाहीत. त्यामुळे मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मुंबईत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य मतदाराला बसल्याची आणखी एक घटना समोर आली. एका मतदाराने पोस्टल मतदान केल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा मतदान करण्यापासून रोखले. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे सामान्यांचा अधिकार हिरावला जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. मतदारयादीतील घोळाचा परिणाम मुंबईतील मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी १७.७३ टक्के मतदान झाले आहे.
