मंगल धुमाळे (वय ४५) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या आई आणि भावापासून वेगळ्या घरात राहत होत्या. गावातीलच कृष्णा जाधव (वय ३०) या युवकासोबत मंगल धुमाळे यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, कृष्णा याला दारूचे व्यसन असल्याने या दोघांमध्ये सातत्याने वाद होत असत. २४ ऑक्टोबरच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून पुन्हा वाद झाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
advertisement
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबरच्या सकाळी मंगल धुमाळे यांची आई पाणी आणण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता, त्यांना ही धक्कादायक घटना दिसून आली. मंगल धुमाळे यांचा मृतदेह घरात पलंगावर आढळला. महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घराबाहेर आढळल्या संशयिताच्या चपला
मृत महिलेच्या बहिणीने २४ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा संशयित कृष्णाला घरातून बाहेर जाताना पाहिले होते. एवढेच नव्हे तर, ज्या घरात खून झाला, त्याच्या दरवाज्यासमोर संशयित कृष्णाच्या चपला आढळून आल्या आहेत. या सर्व पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय प्रियकर कृष्णा जाधव याच्यावर अधिक बळावला आहे. घटनेनंतर लगेचच संशयित कृष्णा जाधव हा गावातून फरार झाला आहे. किनवट पोलीस त्याचा शोध घेत आहेत. किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १२ दिवसांत दोन खून झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
