समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही नागरिक रेल्वे फाटकाजवळून जात असताना त्यांना एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळाचे दृश्य अत्यंत विदारक होते. मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने तिच्या वयाचा, कपड्यांचा किंवा शरीरावरील ओळखीच्या खुणांचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. नागरिकांनी तात्काळ ढोकी पोलिसांना याची माहिती दिली.
जाळण्यापूर्वी तरुणीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज
advertisement
घटनेची माहिती मिळताच ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. जाळण्यापूर्वी तरुणीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमका मृत्यू कसा झाला, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
दरम्यान, मृत तरुणी कोण आहे, ती कुठून आली आणि तिचा कोणाशी वाद होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या तरुणींच्या तक्रारींचीही पडताळणी केली जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू
पोलिसांनी नागरिकांना कोणतीही माहिती असल्यास ढोकी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डोंबिवलीत पत्नीची गळा आवळून हत्या
डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादामध्ये संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. ज्योती धाहीजे असे मृत महिलेचे नाव असून पोपट धाहीजे अस हत्या करणाऱ्या फरार पतीचे नाव आहे. हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशिष्ट पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
