नेमकी घटना काय?
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना येथील मंगेश कांबळे हे परिसरातील एक परिचित सर्पमित्र होते. मंगेश यांना एका मोहिमेदरम्यान सर्पदंश झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका खाजगी रुग्णवाहिकेने त्यांना अकोल्याकडे नेण्यात येत होते.
पैशांसाठी रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतून फिरवली
advertisement
रुग्णवाहिका अकोल्याच्या दिशेने जात असताना चालकाने पैशांची मागणी केली. मात्र, त्यावेळी नातेवाईकांच्या खिशात पुरेसे पैसे नव्हते. नातेवाईकांनी अकोल्याला पोहोचल्यावर पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले, तरीही चालकाला पाझर फुटला नाही. "पैसे नसतील तर पुढे जाणार नाही," अशी भूमिका घेत या निर्दयी चालकाने रुग्णवाहिका अर्ध्या वाटेतूनच पुन्हा मागे फिरवली.
उपचाराला उशीर आणि मंगेशचा दुर्दैवी अंत
रुग्णवाहिका मागे फिरवण्यात आणि वादावादीत बराच वेळ वाया गेला. सर्पदंश झालेल्या मंगेश यांच्या शरीरात विष भिनत होते आणि त्यांना तातडीच्या उपचाराची गरज होती. मात्र, रुग्णवाहिका चालकाच्या या अमानवीय कृत्यामुळे उपचाराला कमालीचा उशीर झाला. अकोल्याला पोहोचण्यापूर्वीच मंगेश कांबळे यांचा श्वास कायमचा थांबला आणि त्यांचा तडफडून मृत्यू झाला.
नातेवाईकांचा संताप
या घटनेनंतर मंगेश यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. "जर रुग्णवाहिका चालकाने माणुसकी दाखवली असती आणि गाडी मागे फिरवली नसती, तर आज मंगेश जिवंत असता," असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित रुग्णवाहिका चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. रुग्णवाहिका चालकाच्या या कृत्याचा नातेवाईकांनी निषेध केला आहे.
