काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यापासून ही चर्चा सातत्याने होत आहे. "जब तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हू" असं सानंदा यांनी म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा थांबल्या. मात्र पुन्हा एकदा दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतराच्या बुलढाणा जिल्ह्यात जोर धरू लागले आहेत.
advertisement
अजितदादा की शिंदे गट?
काही दिवसांपूर्वी बुलढाणा झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेनंतर दिलीप कुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार संजय गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर जाऊन हनुमानाची चांदीची मूर्ती भेट दिली. तसा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. खामगाव शहरात लागलेल्या बॅनर्स वरून दिलीप कुमार सानंदा यांनी महाविकास आघाडीचे नेते हटवून महायुतीच्या नेत्यांचे फोटो लावलेत. त्यामुळे आता दिलीप कुमार सानंदा यांचे पक्षांतर जवळजवळ निश्चित मानलं जाऊ लागले आहे.
कारण काय?
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाच सदस्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश हे त्यासाठी निमित्त समजलं जातं आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांनीच काँग्रेस सोडली म्हटल्यावर आता दिलीप कुमार सानंदा यांचा मुहूर्त कधी ठरतोय याची खामगाव मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना कमालीची प्रतीक्षा लागलीये.
सानंदा म्हणतात, मी अजून तरी...
महाराष्ट्र काँग्रेसची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे हाती दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात तरी काँग्रेसला उतरती कळा लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे मोठे नेते विजय अंभोरे यांनी कधीच काँग्रेसचा हात सोडून हाती शिवसेनेचे धनुष्यबाण घेतलंय. त्यामुळे आता दिलीप कुमार सानंदा हे देखील काँग्रेस सोडतील अशा शक्यता वाढल्या आहेत. मात्र माध्यमांशी बोलताना दिलीप कुमार सानंदा यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
