बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत गेल्या तीन टर्मपासून निवडून येणारे संयुक्त शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यंदा शिंदे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर हे आमने सामने उभे आहेत. बुलढाणा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जुने सहकारी यंदा आमने-सामने असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात महा विकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळालं. मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि संदीप शेळके यांनी देखील प्रचारात चांगलीच मजल मारली असल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी चेहरा म्हणून वसंतराव मगर यांना या लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या सामाजिक परिस्थितीवर नजर टाकली असता प्रमुख चार उमेदवार हे मराठा समाजाचे असल्याने त्यात काही अंशी मताचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवाराला या मतं विभागणीचा फायदा करून घेता आला असता मात्र वंचित बहुजन आघाडीला त्यात यश आले नाही.
त्यामुळे बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील सामना हा महायुतीचे प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर असाच काहीसा पाहायला मिळतोय. यंदा हजारोंच्या संख्येत नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले होते. मात्र त्याच वेळी मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावे देखील गायब असल्याचा धक्कादायक प्रकार मतदान प्रक्रिये दरम्यान समोर आला होता.
अनेक नेत्यांचे प्रचार दौरे!
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी बरोबरच महायुती करून देखील जोरदार प्रयत्न झाले असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, यासोबतच अंबादास दानवे, आमदार रोहित पवार यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या. तर महायुतीकडून भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, रावसाहेब दानवे, अभिनेता गोविंदा यांनी जोरदार प्रचार केला.
2019 च्या लोकसभेततील परिस्थिती
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी 46.59% मतदान घेऊन विजयाची हॅट्रिक मारली, 2019 च्या या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव हे भाजप शिवसेनेच्या युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून गेले आहेत. त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी 34.69% मते घेतली. या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी उमेदवार म्हणून माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांनी तब्बल 15.41% मते घेऊन आघाडीच्या उमेदवारास पराभूत करण्यास एकंदरीतच मदत केली.
वाचा - 'बाबांपेक्षा मला 10 पट संघर्ष करावा लागला, पण..' पंकजा मुंडेंनी व्यक्ती केली मनातली खंत
मत विभाजनाचा फायदा कुणाला?
2024 च्या या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरांमुळे मतदारांमध्ये कमालीचा संभ्रम असल्याचे पाहायला मिळालं. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारची कामगिरी, त्याचबरोबर राज्यातील पक्ष फोडाफोडीचे राजकारण, आणि आमदार खासदारांची पळवा पळवी मतदारांना मुळीच आवडलेली नाही. त्यामुळे केंद्रीय राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांबरोबरच ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली गेली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव - जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न, लोणारचा विकास आराखडा, जिजाऊ जन्मभूमी सिंदखेडराजा नगरीचा विकास आणि खामगाव जिल्हा या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली आहे.
वाचा - बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा रोहित पवारांचा आरोप; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
यंदाच्या या निवडणुकीत बुलढाणा लोकसभेसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात होते. मात्र, महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मगर, तर अपक्ष म्हणून शेतकरी नेते रवीकांत तुपकर आणि बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके हेच पाच प्रमुख उमेदवार निवडणूक प्रचारात सर्व ताकदीनिशी प्रचार करताना पाहायला मिळालेत.
बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना फुटीनंतर खासदार प्रतापराव जाधव आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर त्याचबरोबर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले होते, त्या पाठोपाठ राष्ट्रवादी फुटी नंतर राष्ट्रवादीचे बुलढाणा लोकसभा मतदार संघातील एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील शरद पवारांचा हात सोडून "घड्याळ तीच वेळ नवी" म्हणत अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे आधीच बुलढाणा जिल्ह्यात कमकुवत असलेल्या महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात होता. बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे असल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सहानुभूती म्हणून शिवसेनेचे ठाकरे गटाचे निष्ठावंत उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी निष्ठावंतांना घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साथीने प्रचारात मैदान गाजवलं. त्या पाठोपाठ अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या निवडणुकीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत चांगलीच रंगत वाढवून दिली. येत्या 4 जून रोजी बुलढाणा येथील आयटीआय शाळेत लोकसभेच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे बुलढाणातील मतदार राजा कुणावर मेहरबान झालाय ? हे येणाऱ्या चार तारखेला कळेलच!
