तीन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू
संग्रामपूर येथे सासऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला चढवत गर्भवती सून आणि नातू ठार केले आहेत. तर नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नवऱ्यानेच बायकोचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर तिकडे चिखली जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या तीनही हत्याकांडांमध्ये चार जणांचा खून करण्यात आला आहे. मात्र, खून करण्यामागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
advertisement
सासऱ्याने घेतला गर्भवती सुनेसह नातवाचा बळी
जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65 वर्षे) असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. तर अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी (8 वर्षे) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. क्षुल्लक कारणातून वाद झाल्याने सासरा नारायण गायकी याने सून अश्विनी आणि नातू समर्थ यांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे अश्विनी ह्या गर्भवती होत्या. हे सर्व माहित असताना सासरा नारायण गायकीने दोघांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात 8 वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत पोटात असलेलं बाळाचाही मृत्यू झाला आहे. संग्रामपूर येथील हत्याकांडातील आरोपी सासर्याने स्वतः पोलिसांना समर्पण केले आहे.
वाचा - गोंदिया हादरले! 38 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोघांना अटक
तर वडनेर येथील हत्याकांडात श्वान पथकाच्या मदतीने बायकोला मारणारा नराधम पती पोलिसांनी जेरबंद केला आहे. मात्र चिखली जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात राजवाडा हॉटेल मागे अर्धवट जळालेल्या युवतीच्या मृतदेहाबाबत अद्याप आरोपींचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाच शोध पथक तयार करून आरोपींच्या शोध कार्यासाठी पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच बुलढाणा पोलीस तिसऱ्या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना देखील जेरबंद करतील असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.
