येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी 10 हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान 9 हजार व कापसाला किमान 12,500 रु. भाव मिळवा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व 100 टक्के पिकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी यासह सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार असून 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
advertisement
रविकांत तुपकरांवर पोलिसांची करडी नजर
रविकांत तुपकर हे गेल्या तीन दिवसांपासून चिखली तालुक्यातील सोमठाणा या गावात अन्नत्याग आंदोलन करत आहेत, तर उद्या सकाळी ते मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, अशातच ते रात्री आंदोलन स्थळावरून पोलिसांना गुंगारा देऊन बेपत्ता होऊ नये किंवा इतर कुठला अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने चिखली पोलिसांनी आंदोलन स्थळी सीसीटीव्ही लावले आहेत. यापूर्वी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर हे आंदोलन स्थळावरून बेपत्ता झाले होते, याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी राखल्याचं दिसून येत आहे.
वाचा - 'कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास..' मनोज जरांगे पाटलांकडून अखेर 'तो' शब्द मागे
तुपकर स्वाभीमानीला विसरले?
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या "एल्गार रथयात्रेची" बुलढाण्यात भव्य मोर्चात आणि सभेत सांगता झाली. मात्र, गेल्या पंधरा ते सोळा दिवसात रविकांत तुपकर यांनी काढलेल्या जिल्हाभरातील या एल्गार रथयात्रेत कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बॅनर किंवा स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा साधा उल्लेखही केला नाही. असे असले तरी रविकांत तुपकर यांच्या अटकेनंतर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीका केली.
