ठाकरे गटाचा बुलढाणा लोकसभेचा उमेदवार ठरला
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे. न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. ठाकरे गटाचे बुलढाणा लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभा उद्धव ठाकरे गटाला दिल्याचे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे हे 21 आणि 22 फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येत आहेत. यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात.
advertisement
बुलढाणा लोकसभा मतदान संघ हा गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. आतापर्यंत शिवसेनेचे आनंद अडसूड 2 वेळा खासदार तर 3 वेळा प्रतापराव जाधव यांनी गड राखला आहे. खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. खासदार जाधव हे शिंदे गटात गेल्याने त्यांना उमेदवारी ही शिंदे गटात म्हणजेच महायुतीकडून मिळणार आहे. तर ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी घोषित होणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीनेही याला सहमती दिल्याचे बोलले जात आहे.
वाचा - 'माझा नाईलाज, पण कोणामुळे ही वेळ..' काँग्रेसची साथ सोडल्यानंतर बाबा सिद्दीकींची पहिली प्रतिक्रिया
मातोश्रीवरील बैठकीत निर्णय
ठाकरेंचं निवास्थान मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे.
