काल रात्री नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे काल दुपारीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावर असलेली गव्हाची काढणी अत्यंत घाईघाईने उरकण्यात आली. शेतातील गहू कापून तो तातडीने तेथून हलवण्यात आला. पोलिसांची कारवाई होणार याची कुणकुण खरातला आधीच लागली होती का? आणि अटकेपूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा किंवा तिथून काही संशयास्पद वस्तू हलवण्याचा हा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत.
advertisement
कुठं कुठं खरातची संपत्ती?
केवळ नाशिकच नव्हे, तर सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला, तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही 'माया' जमवली गेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खरातचे पाय अधिकच खोलात
अशोक खरातच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. त्याच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ आणि आता समोर आलेली ही बेनामी संपत्ती, यामुळे खरातचे पाय अधिकच खोलात गेले आहेत. नाशिक गुन्हे शाखा आता त्याच्या सर्व बँक खात्यांची आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.
व्हिडीओची सखोल तपासणी सुरू
बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करीत आहे.
हे ही वाचा :
