सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम (२६) टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे (३०) सुलतान अली साबीर अली (३०), बबलू मुनीर सय्यद (३८) असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी चंद्रपूर शहरातील अष्टभूजा वॉर्ड परिसरातील रहिवासी आहेत. तर छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ (३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. चार आरोपींनी लाठीकाठीने मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. या हत्येमागे प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृणाल हेडाऊ हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. तो एकटाच राहत असल्याने परिसरातील एका तरुणाच्या मैत्रिणीशी तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब आरोपी सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम याला आणि त्याच्या मित्रांना समजली. त्यानंतर त्यांनी मृणालला जाब विचारण्यासाठी अष्टभूजा परिसरात गाठले.
'तू माझ्या मैत्रिणीशी जवळीक का साधतोस?' असा प्रश्न विचारत चौघांनी मृणालला लाठीकाठीने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गंभीर जखमी झालेल्या मृणालचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्रामसह त्याच्या इतर तीन मित्रांना देखील अटक केली. हे चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली लाठीकाठी आणि कपडे जप्त केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
