अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एकमेकांचे नेते, पदाधिकारी न फोडण्याबाबत भाजप आणि शिंदे गटात सहमती झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. भाजपने शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपल्याकडे खेचला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्रीत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद ढोके यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ढोके यांनी अचानक भूमिका बदलल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्यांनी विकासाच्या दृष्टीने हा निर्णय असल्याचे सांगत त्यांचे स्वागत केले आहे.
advertisement
या घडामोडीमुळे शिंदेसेनेत नाराजी व्यक्त करण्यात येत असून पक्ष शिस्तीचे उल्लंघन झाल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे मतदारांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या बदलाचा निवडणूक निकालावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत प्रचार मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता असून फुलंब्रीत राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले आनंदा ढोके यांनी अनपेक्षितपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकच खळबळ उडाली. या घडामोडीनंतर शिंदे गटाने भाजपवर युती धर्म भंग केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे.
फुलंब्रीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात आधीच युती ठरलेली असताना शिंदे गटाने स्वतंत्रपणे मैदानात उतरून नगराध्यक्षपदासह ११ जागांवर उमेदवार उभे केले होते. नगराध्यक्षपदाची धुरा आनंदा ढोके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भातील वाद न्यायालयात गेल्याने अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून फुलंब्रीत राजकीय हालचालींची चुरस वाढली. भाजपने ढोके यांना आपल्या गोटात आणण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आणि ती यशस्वीही ठरली. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ढोके यांनी “पक्षांतर्गत अडचणींमुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे आणि भाजपत प्रवेश करीत आहे,” अशी घोषणा केली. त्यानंतर थोड्याच वेळात भाजप जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट आणि योगेश मिसाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरीत्या भाजप प्रवेश केला.
भाजपाने महायुतीचा धर्म पाळला नाही, शिंदे गट आक्रमक
थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. भाजपने महायुतीचा प्रोटोकॉल तोडला असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. भाजपने आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडून युती धर्माचाच भंग केला आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा आग्रह आनंदा ढोके यांनीच पक्षाकडे धरला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाने उमेदवारी दिली होती असे शिंदे गटाचे नेते त्रिंबक तुपे यांनी म्हटले. ग्रामीण भागात अनेक निवडणुका येत आहेत. आमच्याविरुद्ध असा खेळ केला जात असेल तर आम्हालाही निर्णय घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.
