प्राथमिक माहितीनुसार, या फसवणुकीचे धागेदोरे थेट उत्तराखंडपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले आहे. वीरगावातील तीन ते चार जण मध्यस्थ म्हणून कार्यरत होते आणि ते रुद्रपूर (उत्तराखंड) येथील मुख्य आरोपींपर्यंत पैसे पोहोचवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
या टोळीने साखळी पद्धतीने जाळे उभारले होते. एका व्यक्तीला फसवल्यानंतर त्याच्यामार्फत आणखी दोन जणांना जाळ्यात ओढण्याची पद्धत वापरली जात होती. नोकरीच्या नावाखाली प्रत्येकाकडून 30 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली गेली. वैजापूरसह शेजारील तालुक्यांतील अनेक तरुण यात बळी पडले आहेत. पैसे दिल्यानंतर बराच काळ उलटूनही नोकरीबाबत कोणतीही प्रगती न झाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर संबंधितांकडे पैशांची मागणी केल्यावर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे पीडितांनी सांगितले.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व 37 तरुणांनी एकत्र येऊन वीरगाव पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला. या अर्जामध्ये वीरगावातील चार संशयितांची नावे नमूद करण्यात आली आहेत. पोलिसांनी अर्ज स्वीकारून चौकशी सुरू केली आहे.
या संदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील तरुणांकडून रेल्वे नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
पीडित अक्षय वाकडे (हनुमंतगाव, ता. वैजापूर) यांनी सांगितले की, शिक्षणानुसार नोकरी मिळेल या आशेने त्यांनी वीरगावातील एका व्यक्तीकडे 35 हजार रुपये दिले, मात्र नोकरी मिळाली नाही. तसेच परमेश्वर गायकवाड (नगिना पिंपळगाव) यांनी सांगितले की, रेल्वे नोकरीसाठी त्यांनी एका व्यक्तीमार्फत दीड लाख रुपये दिले, पण त्यांचीही फसवणूक झाली. या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






