अंबादास दानवे यांची खदखद...
संभाजीनगर लोकसभा उबाठा गटाची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना जाहीर झाली. यावर सकाळी उबाठाचे दुसरे दावेदार अंबादास दानवे यांनी आपण नाराज नसल्याचे मीडियाला सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी व्हॉटसअपवर एक शायरी स्टेटसला ठेवली. या स्टेटस चा अर्थ समजून घेणे तसे अवघड आहे. मराठीत त्याचा अर्थ आपण काढू शकतो. "सध्या कुटनीतीचा काळ आहे. आणि आम्ही प्रयत्नामध्ये गुरफटून गेलो आहोत"
advertisement
यामधून अंबादास दानवे यांच्या मनातील खदखद दिसत आहे. उमेदवारीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होतो. आणि आताचा काळ कुटनीतीचा आहे. अंबादास दानवे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा पराभव झाला आणि कुटणीतीचा विजय झाला, असे त्यांना म्हणायाचे असू शकते. म्हणजे उबाठामध्ये चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीमुळे अंबादास दानवे नाराज दिसत आहेत. आणि ही नाराजी उबाठा गटाला परवडणारी नाही. कदाचित अंबादास दानवे वेगळा पर्याय निवडू शकतात.
मित्रपक्षही ठाकरे गटावर नाराज
उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे, असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
