युरिया विषबाधा ही सर्वात घातक प्रकारामध्ये मोडते. विषबाधा झाल्यानंतर जनावरे उपचारासाठी फार वेळ देत नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रथमोपचार देणे माहिती असावे. शेतात, वैरणीमध्ये किंवा पाण्यात जनावरांच्या खाण्यात युरिया आला असेल तर त्या स्थळावरून जनावराला दुसऱ्या ठिकाणी न्यावे. जेणेकरून अधिक विषबाधा होणार नाही.
advertisement
लगेच द्या हे औषध
व्हिनेगर किंवा ऍसिटिक ऍसिड हे औषध मेडिकल, जनरल स्टोअर्स अशा सर्व ठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे डॉक्टर येण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांनी व्हिनेगर किंवा ऍसिटिक ऍसिड 4 लिटर औषध हे 20 लिटर पाण्यात मिश्रण करून त्वरित जनावरांना हळू-हळू पाजावे. तसेच थंड पाणी पाजावे. जनावर मोठे असल्यास 40 लिटरच्या आसपास पाणी द्यावे. त्यानंतर डॉक्टर पुढील उपचार करतात. परंतु प्राथमिक उपचार जर वेळोवेळी केले तर आपण जनावरांचा जीव वाचवू शकतो, असे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. असरार अहमद यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
चारा प्रक्रियेत युरिया कशासाठी?
चारा प्रक्रियेत युरियाचा वापर जनावरांच्या पौष्टिक आहारासाठी केला जातो. वाळलेल्या चाऱ्यात प्रथिने कमी असतात. त्यामुळे युरियाचा वापर करून प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते. जनावरांना चांगला आणि पौष्टिक आहार मिळतो. चारा प्रक्रियेत 2 ते 4 टक्क्यांपर्यंत युरियाचा वापर करावा. त्यापेक्षा अधिक वापर केल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे देखील असरार यांनी सांगितले आहे.