छत्रपती संभाजीनगर : बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य आणि पटनादेवी वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते. यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये वन्यप्रेमींनीही सहभाग नोंदवला. याबाबत मानद वन्यजीव संरक्षक डॉक्टर किशोर पाठक यांनी माहिती दिलीय.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य आणि पटनादेवी वन्यजीव विभागातर्फे प्राणी गणना करण्यात आली. दरवर्षी होणारी प्राणी गणना गेल्या चार वर्षांत कोरोनामुळे बाधित झाली होती. यंदा पुन्हा या प्राणी गणनेस सुरुवात करण्यात आली. या आयोजनात अनेक निसर्गप्रेमी तसेच वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला.
advertisement
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सायंकाळी साडेपाच ते सकाळी सात पर्यंत प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यासाठी मचाण उभारण्यात आली होती. गौताळा अभयारण्याच्या 240 चौरस किलोमीटर एवढ्या भागात ही प्राण्यांची गणना करण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.
कोणते प्राणी आढळले?
अभयारण्यात रानडुक्कर, नीलगाय, ससा, अजगर, मोर, घुबड, उदमांजर, रान मांजर, भेकर, चौसिंगा, मुंगूस, साप दिसून आले. 51 नीलगाय, आठ मुंगूस, दोन भेकर, 62 रान डुक्कर, 44 माकड, 41 मोर ,78 मोठे वटवाघूळ, 34 छोटे वटवाघूळ, दोन अजगर, 8 साप, 11 उदमांजर, 6 रान मांजर या परिसरात आढळले. त्यासोबतच बिबट्याचं देखील दर्शन निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींना झालं, असंही पाठक यांनी सांगितलं.