पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 102 टीएमसी क्षमतेच्या या धरणातून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. यंदा धरणातून प्रथमच पाणी सोडण्याची प्रक्रिया 31 जुलै रोजी सुरू झाली होती, तर दुसऱ्यांदा 21 ऑगस्टला पाणी सोडण्यात आले. धरणाच्या 27 पैकी 18 दरवाजे वापरून मागील महिनाभर सुरू असलेला विसर्ग अखेर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता धरणाचा साठा सुरक्षित स्तरावर ठेवण्यात आला आहे.
advertisement
जायकवाडी धरणाची 1973 मध्ये निर्मिती करण्यात आली, या निर्मितीच्या काळापासून धरणातून आजपर्यंत 24 वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये यंदाचा साठा 98 टक्क्यांवर पोहोचल्याने दुसऱ्यांदा गेट उघडून पाणी सोडण्यात आले.
धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी गोदावरीच्या प्रवाहातून मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणातील काही भागांपर्यंत पोहोचले. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला असून, विशेषतः खरीपासोबत रब्बी हंगामासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध राहणार आहे.
जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने यंदा पिण्याचे पाणी, उद्योगधंदे तसेच शेतीसाठी मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार, यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या 27 पैकी 18 दरवाजांतून विसर्ग सुरू होता; मात्र सध्या आवक कमी झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आहेत. या समृद्ध साठ्यामुळे मराठवाड्यासह आसपासच्या भागांना पिण्याचे पाणी सुरळीत मिळणार असून, उद्योगांना उत्पादनासाठी पुरेसा जलपुरवठा होईल.