छत्रपती संभाजीनगर : आपला स्वतःचा छोटासा का होईना व्यवसाय असावा, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. आपल्या व्यवसायातून आपण चांगले उत्पन्न कमवावे ही देखील आपली इच्छा असते. अशीच इच्छा छत्रपती संभाजी नगर शहरात राहणाऱ्या दाम्पत्याची होती. एकनाथ गोपाळ आणि अश्विनी गोपाळ असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी स्वतःचा दही धपाट्याचा व्यवसाय सुरू केला. आज ते या व्यवसायात यशस्वी झाले आहेत. जाणून घेऊयात त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास.
advertisement
एकनाथ गोपाळ आणि अश्विनी गोपाळ हे मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगाव या गावचे आहेत. एकनाथ गोपाळ हे पहिले एसटीडी बूथ व्यवसाय करायचे. पण काही कारणामुळे त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण शेती करूयात आणि शेतीतून उत्पन्न कमवुयात. मग त्यांनी शेतामध्ये विहीर खोदली. पण त्या विहिरीला पाणी नाही लागले. त्यामुळे ते खूप निराश झाले. आता आपण काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला.
मुले मोठी होत होती. मुलांचे शिक्षणही त्यांना करायचे होते. म्हणून आपण स्वतःचा एक हॉटेलचा व्यवसाय म्हणजे चहाची टपरी टाकूयात, असा विचार केला. त्यांना स्वतःची चहाची टपरी टाकायची होती. पण ती टाकण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांकडून 500-500 रुपये उसने घेतले आणि साडेतीन हजार रुपये त्यांच्याकडे जमा झाले आणि त्यातून त्यांनी स्वतःची चहाची एक टपरी माजलगाव या ठिकाणी टाकली.
कबड्डीची तालीम करत दहीहंडी पथक सुरू; मुंबईतील डॉक्टर, पोलीस विवाहित महिलांच्या जिद्दीची कहाणी, VIDEO
काही दिवस या ठिकाणी फक्त चहा विकायचे. पण नंतर त्यांनी पोळी भाजी सुरुवात केली आणि त्यानंतर आपण आणखी वेगळं काहीतरी करावे, म्हणून त्यांनी धपाटे विकण्यास सुरू केली. 2006 साली त्यांनी ओम दही धपाटे हा ब्रँड विकसित केला आणि विकायला सुरुवात केली. त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी चांगला चालला होता. पण मुलांना पुढील शिक्षणासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यावे लागले आणि 2015 साली ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आले.
या ठिकाणी येऊन देखील त्यांनी ओम दही धपाटे हा व्यवसाय परत नव्याने सुरू केला. पण यावेळी त्यांना ग्राहकांना काहीतरी वेगळे द्यायचं होतं म्हणून त्यांनी या धपाट्याचे वेगवेगळे प्रकार सुरू केले. सध्या त्यांच्याकडे तब्बल 24 प्रकारचे धपाटे मिळतात. यामध्ये तुम्हाला पालक, मेथी, गोबी, चीज पराठा, मशरूम, असे वेगवेगळे धपाटे उपलब्ध आहेत.
पुण्यातील इस्कॉनमध्ये साजरा झाला गोपाळकाला, 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, VIDEO
त्यासोबतच त्यांनी धपाट्यामध्ये देखील एक वेगळे इनोव्हेशन केले आहे. त्यांनी डिझ्झा हा एक पिझ्झा सारखा पदार्थ द्यायला सुरुवात केली. आणि त्यांच्या या डिझ्झा या पदार्थाला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून आणि ग्राहकांकडून मागणी आहे. तसेच त्यांचे दही धपाटे देशभरासह जगभरामध्येही खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना बाहेर देशातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
तब्बल 12 देशांमध्ये त्यांचे धपाटे हे पोहोचलेले आहेत. व्यवसायामधून ते महिन्याकाठी चांगलं उत्पन्न कमवत आहेत. तसेच त्यांच्याकडे आज 9 ते 10 लोक कामालाही आहेत. यातून त्यांनी रोजगार निर्मिती देखील केलेली आहे. या दही धपाट्याच्या व्यवसायामुळे आज ओम दही धपाटे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राचा देशभरासह जगभरात देखील पोहोचलेला आहे आणि हे मराठवाड्यातील लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे ते सांगतात.