छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असलेल्या एका 35 वर्षीय महिलेने ऑनलाइन गेम खेळताना तब्बल 4 लाख रुपये गमावले. या आर्थिक धक्क्याचा गंभीर परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर झाला. परिस्थिती इतकी बिघडली की तिला जिल्हा रुग्णालयातील मनोविकार विभागात दाखल करावे लागले.
पत्नी रोज ‘तोच’ प्रश्न विचारायची, पतीचं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ!
advertisement
सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या या महिलेने सुरुवातीला 500 रुपये लावून ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात पैसे दुप्पट मिळत असल्याचा अनुभव आल्याने गेम खेळण्याची सवय वाढत गेली. त्याचबरोबर लावल्या जाणाऱ्या रकमेचाही आकडा सातत्याने वाढत गेला. मात्र, एका टप्प्यावर या गेममध्ये तिने एकाच वेळी 4 लाख रुपये गमावले. या घटनेनंतर तिची मानसिक स्थिती खालावली आणि ती आत्महत्येचे विचार करू लागली. ही गंभीर अवस्था लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर झाली असून, नुकतेच तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मोठी रक्कम गमावल्यानंतर संबंधित महिलेची मानसिक स्थिती इतकी बिघडली की तिने बोलणेही थांबवले होते. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्याने डॉक्टरांनी तिची अवस्था सुधारली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ज्ञ डॉ. जितेंद्र डोंगरे, डॉ. जगदीश टेकाळे, डॉ. गजानन कबले, तसेच तेजस्विनी तुपसागर आणि महेश मरकड यांनी तिच्यावर उपचार केले.
ऑनलाइन गेम्स तसेच शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमध्ये पैसे गमावल्याने मानसिक तणावात सापडलेल्या दर महिन्याला 4 ते 5 महिला उपचारासाठी येत असल्याची माहिती मनोविकार विभागाकडून देण्यात आली. सुरुवातीला सहज पैसे मिळत असल्याचा भास निर्माण होतो आणि त्यामुळे व्यक्ती या प्रकारांच्या आहारी जाते. महिलांमध्येही हा कल वाढत असल्याचे चित्र चिंताजनक असल्याचे मनोविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले.






