बीड बायपास रोडवरील शुभम लॉन्स येथे गुरुवारी (12 फेब्रुवारी) लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मंडप सजलेला, पाहुण्यांची लगबग, आणि नवरी मुलगीही साजशृंगार करून तयार… वातावरणात लग्नसोहळ्याचा उत्साह होता. मात्र, याच वेळी महिला आणि बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांना या विवाहाबाबत संशयास्पद माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्याशी संपर्क साधला.
advertisement
Success Story : सॉफ्टवेअर इंजिनिअर सुष्मिताने सुरू केला बिझनेस, वर्षाला 50 लाख उलाढाल
पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लग्नसोहळा थांबवण्यात आला. मंडपात सुरू असलेली लगबग क्षणात शांत झाली आणि एक मोठा अनर्थ टळला.
मुलीच्या आईने आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्या मुंबईत धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहावे लागते. घरात पुरुष व्यक्ती नसल्याने आणि मुलगी एकटी राहिल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत त्या सतत चिंतेत असत. “वाईट नजरा, चुकीचं वातावरण… मला भीती वाटते,” असे सांगताना त्या आईचा आवाज दाटून आला होता. या भीतीपोटीच त्यांनी संभाजीनगरमधील 22 वर्षीय रिक्षाचालकाशी मुलीचे लग्न ठरवले होते.
लग्नासाठी आहेर, भांडीकुंडी, सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र, कायद्याची जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले. पोलिसांनी पालकांना समुपदेशन करून अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाचे आणि भविष्याचे महत्त्व पटवून दिले.
आईची भीती खरी होती, पण उपाय चुकीचा होता आणि म्हणूनच वेळीच घेतलेल्या या निर्णयामुळे एका मुलीला तिचं शिक्षण, स्वप्नं आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.






